हरिहर (Harihar)
हरिहर (Harihar) किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो. नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पासुन २० किमी अंतरावर हा किल्ला आहे. हरिहर किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ११२० मीटर इतकी आहे. ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे.
नाशिक जिल्ह्यातील सेलबारी – डोलबारी रांग, अजंठा – सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.
नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर दुसर्या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही या परिसरातील प्रमुख नदी आहे. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.
उंची : ३६७५ फूट ⛰️
इतिहास 🚩
● हरिहर (Harihar) उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता.
● शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुन:स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला.
● मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला.
● पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली.
● ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला.
● शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला.
स्थळदर्शन 😍
◆ किल्ल्यावर चढण्यासाठी ८५ अंशाच्या सरळ कातळात खोदलेल्या पायऱ्या चढाव्या लागतात.
◆ पायऱ्या चढल्यावर समोरच दरवाजा लागतो.
◆ दरवाज्यातून आत आल्यावर दगड कोरून बोगदा बनवलेला आहे, ज्याच्या एका बाजूने भिंत नसून सरळ खोल दरी आहे.
◆ इथून पुढे गेल्यावर काही पायऱ्या चढून गेल्यावर परत एक बोगदा येतो, त्यातल्या पायऱ्या चढून आपल्याला वर जावे लागते.
◆ इथून वर गेल्यावर परत एक दरवाजा लागतो, ज्याची आता पडझड झालेली आहे परंतु अजूनही हा दरवाजा उभा आहे.
◆ दरवाजाचे बांधकाम दगड आणि विटांचा वापर करून केलेले आहे.
◆ इथून पुढे बालेकिल्ल्याच्या दिशेने गेल्यावर डाव्या बाजूला अजून एक दरवाजा आहे.
◆ इथे जाण्यासाठी खाली उतरावे लागते. वाट थोडी अवघड आहे जाणे टाळले तर उत्तम.
◆ या दरवाजाला गुप्त दरवाजा असेही म्हणतात.
◆ दरवाजा बघून परत वर येऊन पुढे गेलं की आपल्याला हनुमानाचे मंदिर दिसते.
◆ मंदिराच्या मागच्या बाजूला तळे आहे.
◆ या तळ्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.
◆ तळ्याच्या एका बाजूला शंकराची पिंड आहे.
◆ इथून पुढे गेलं की डाव्या बाजूला गडावरील सर्वात उंच जागा म्हणजे बालेकिल्ला आहे.
◆ इथे चढण थोडं अवघड आहे.
◆ इथून उतरून पुढे गेलं की आपण गडाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन पोहचतो.
◆ जाताना आपल्याला बरीच पाण्याची टाकी दिसतात.
◆ गडाच्या दुसऱ्या टोकाला गडावरील एकमेव सुस्थितीत असलेली वस्तू दिसते.
◆ गड उतरून हर्षेवाडी मार्गे खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूने थोडे पुढे गेल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेली पुष्करणी आपल्याला दिसते. ही पुष्करणी किती वर्षे जुनी आहे हे अजून तरी समजले नाही.
◆ पुष्करणी शेजारी एक मंदिरही आहे.
◆ पुष्करणी शेजारी एक जुना शिलालेख आहे.
विशेष 🤩
★ १८१८ ला इंग्रजांनी महाराष्ट्रातील सर्व किल्ले जिंकले व त्याचे मार्ग उध्वस्त केले पण हरिहर (Harihar) किल्ला याला अपवाद आहे. कारण हरिहर (Harihar) जिंकल्यानंतर हरिहरच्या पायऱ्या बघून खुश झालेल्या कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने हा किल्ला तसाच ठेवला.
जवळचे किल्ले 🤩
- भास्करगड
- दुर्ग भंडार
- नवरा नवरी
- रांजणगिरी
- गडगडा
- भूपतगड
- बाहुला
- त्र्यंबकगड
कसे जाल ? 🚶🏻♂️
मुंबईहून कसाऱ्याला आलं की तिथुन हर्षेवाडी साठी किव्हा निर्गुडपाडा साठी गाडी करावी दोन्ही ठिकाणावरून किल्ला अगदी जवळ आहे.
पहिला मार्ग: नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.
दुसरा मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून १५ किमीवरच्या लागणाऱ्या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते.
- राहाण्याची सोय :किल्ल्यावर राहण्यासाठी इमारत आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते.
- जेवणाची सोय :किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी. किल्ल्याच्या खाली असलेल्या गावांमध्ये जेवणाची सोय होऊ शकते.
- पाण्याची सोय :गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.