रायगड ( Raigad )

रायगड (Raigad) किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. इथे अलीकडे पर्यटकांच्या संख्येत वाढ झ़ाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची अधिकृत राजधानी म्हणून रायगड प्रसिद्ध आहे. महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला हा किल्ला चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो.

उंची : २७०० फूट ⛰️

इतिहास 🚩

● सुरवातीच्या काळात रायगडाला गडाचे स्वरूप न्हवते व तो फक्त डोंगर होता.
● ६ एप्रिल १६५६ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी जिंकून घेतला व त्यानंतर त्यावर बांधकामाला सुरवात झाली.
● गडाची दुर्गमता आणि प्रचंड विस्तार पाहून महाराजांनी याच गडाला राजधानी करण्याचे ठरवले.
● छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा याच किल्ल्यावर झाला.
● १६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी हा किल्ला घेतला.
● १७३३ मध्ये शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा स्वराज्यात आला.
● १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे रायगडही इंग्रजांच्या ताब्यात गेला.

स्थळदर्शन 😍

खुबलढा बुरूज : गड चढायला सुरवात केल्यावर सर्वप्रथम एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज.
चित्त दरवाजा : खुबलढा बुरुजाच्या ठिकाणी पूर्वी चित्त दरवाजा होता. जो आता उध्वस्त झालेला आहे.
नाना दरवाजा : या दरवाज्यास ’नाणे दरवाजा’ असेही म्हणत. हा रायगडाचा आणखी एक दरवाजा आहे. सध्या चित्त दरवाजा शेजारून डांबरी रस्ता खाली जातो तिथून याची वाट आहे. या दरवाज्याचा संबंध गैरसमजूतीने नाना फडणिसांशी लावला जातो. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा आहे. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी दोन लहान खोल्या आहेत, त्यांस ’देवड्या’ म्हणतात.
मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित्‌ दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्‍यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
अंधारी लेणी : मशीदमोर्चापासून पुढे चालत गेल्यावर या लेणी येतात, या दगडात कोरल्या असून त्याच दगडाच्या विटांच्या भिंती बांधल्या आहेत.
महादरवाजा : महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. या बुरुजांना “जय आणि विजय” ही नावं आहेत. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
चोरदिंडी : महादरवाजा पासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी (चोर दरवाजा) बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायर्‍या आहेत.
हनुमान टाके : महादरवाजातून आत आल्यावर, थोडं चढून वर आलो की समोरच हनुमान तलाव आहे. यात पाण्याच्या ३ टाक्या आहेत आणि या तलावाच्या भिंतींच्या एका बाजूला हनुमानाची सुरेख मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला दोन देवळ्या सुद्धा आहेत.
लोहस्तंभ : हनुमान टाक्याच्या बाजूलाच हा एक लोहस्तंभ आहे. ज्याबद्दल अस म्हटलं जातं की हा आरोपींना बांधून शिक्षा करण्यासाठी होता. त्यात किती तथ्य आहे आता सांगणं शक्य नाही. या स्तंभावर काही लिहल आहे जे आता वाचता येत नाही.
हत्ती तलाव : पुढे आल्यावर जो तलाव दिसतो, तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणार्‍या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.या तलावाच्या तळाला दरीच्या दिशेला एक दगड बसविलेला होता. उन्हाळ्याच्या शेवटी हा दगड काढून तलाव रिकामा करून साफ केला जात असे. २०२० या साली इथे परत दगड लावण्यात आला आहे.
गंगासागर तलाव : हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० – ६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
पालखी दरवाजा : रायगडावरील मनोर्‍यांच्या (स्तंभांच्या) पश्चिमेस तटबंदीत ३१ पायर्‍या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा.
मेणा दरवाजा : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात, ते आहेत राण्यांचे महाल.
राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या घरांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आ.हे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे, तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.
राजसदर : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसदर. राजसदर २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते.
टांकसाळ : पालखी दरवाजा शेजारी ही टांकसाळ आहे. जिथे नाणी तयार केली जात असत.
खलबत खाना : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
नगारखाना : सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायर्‍या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.
बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ’होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत, मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.
अष्टप्रधान मंडळांचे वाडे : राजभवनाच्या खालच्या बाजूला अष्टप्रधान मंडळाचे वाडे आहेत.
धान्यकोठार : राजभवन, अष्टप्रधान मंडळाचे वाडे आणि राणीवसा यांच्या मध्ये एक तळघर आहे आणि ते जाळीने झाकले गेले आहे. हे शिवरायांच्या काळात धान्यकोठार असावे आणि नंतर याचा उपयोग तुरुंगासाठी केला जात होता. असे सांगितले जाते.
शिरकाई देवीचं मंदिर : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता होय.
हत्ती खाना : बाजारपेठेच्या मागे असणारी इमारत म्हणजे हत्तीखाना होय. इथे सध्या गडावर खोदकामात सापडलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
होळीचा माळ : नगारखाना आणि बाजारपेठेच्या मध्ये जी जागा आहे तिला होळीचा माळ असे म्हणतात. इथे त्याकाळात सर्वात मोठी होळी पेटवली जात असे.
जगदीश्वर मंदिर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्‍याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्‍यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे, ’सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर’


Hiroji indulkar
सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर
  • या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे:

श्री गणपतये नम : ।
प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया
श्रीमच्छत्रपते शिवस्यनृपते सिंहासने तिष्ठत :।
शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे
ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ।।१।।
वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ
स्तभे कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो
यावƒन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।२।।

Hiroji indulkar


याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे,
’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद्‌ छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’

महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्व दरवाजा पासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी.
कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते.
वाडेश्वर मंदिर : कुशावर्त तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.
वाघ दरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ’किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे.
हिरकणी बुरुज : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते, ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्‍यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.
भवानी टोक : महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे.
भवानी मंदिर : भवानी टोकावरून खाली उतरून गेले की एक छोटी गुहा आहे हेच भवानी मंदिर आहे.
दारुगोळा कोठार : महाराजांच्या समाधीच्या उजवीकडे दारुगोळा कोठार आहे.
बारा टाकी : दारुगोळा कोठाराजवळच ही पाण्याची बारा टाकी आहेत.
काळा तलाव : भवानी टोकावरून परतताना हा तलाव दिसतो.
शिबंदी : समाधी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते.
वृंदावन : दारुगोळा कोठाराजवळून खाली उतरून बाजारपेठेकडे गेल्यावर झाडाझुडपांमध्ये एक अतिशय सुंदर तुलसी वृंदावन लपलेले आपल्याला दिसते.
रायगडावरील अश्‍मयुगीन गुहा ( वाघबीळ ) : खुबलढा बुरुजावरून खाली उतरल्यावर समोरच असणाऱ्या हॉटेलच्या मागच्या बाजूला ५ ते ७ मिनिटांच्या अंतरावर हे वाघबीळ आहे.

विशेष 🤩

दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. :-

१.रायगड (Raigad)
२.रायरी
३.इस्लामगड
४.नंदादीप
५.जंबुद्वीप
६.तणस
७.राशिवटा
८.बदेनूर
९.रायगिरी
१०.राजगिरी
११.भिवगड
१२.रेड्डी
१३.शिवलंका
१४.राहीर आणि

१५.पूर्वेकडील जिब्राल्टर.

कसे जाल ? 🕺🏼

महाडला पोहोचल्यावर तिथून पाचाडला जाण्यासाठी बस मिळते अथवा बाकी वाहने सुद्धा उपलब्ध आहेत. पाचाड वरून पुढे गेला की २ रस्ते आहेत तुम्ही रोप वे ने जाऊ शकता अथवा नाणेदारवाजा किंवा चित्ता दरवाज्याने वर जाऊ शकतो.

  • राहाण्याची सोय : रायगड किल्ल्यावर एमटीडीसीच्या बंगल्यांमध्ये किंवा डॉरमिटरी हॉलमध्ये राह्ण्याची सोय होऊ शकते. महाराष्ट्र राज्य पर्यटन केंद्र, नरिमन पॉइंट, मुंबई-२१ यांच्याशी संपर्क केल्यास किंवा एमटीडीसीच्या साईट वरुन ऑनलाईन बुकींग केल्यास राहण्याची सोय होऊ शकेल.
  • जेवणाची सोय : गडावरील काही गाईड त्यांच्या घरात जेवणाची सोय करतात.
  • पाण्याची सोय : गंगासागर तलावाचे पाणी आणि हनुमान टाक्यातले पाणी पिण्यासाठी वापरले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search