सोलापूरचा भुईकोट किल्ला (Solapur fort)
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात अप्रतिम कलाकुसरीने नटलेला एक भुईकोट किल्ला म्हणजे सोलापूरचा भुईकोट किल्ला (Solapur fort). महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश (तेलंगणा) या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेले एक मिश्रभाषिक गाव म्हणजे सोलापूर. मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या किल्ल्याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. बहमनींच्या राज्याची शकले उडाल्यावर त्यातून पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाच शाह्यांनी आपली वेगळी चूल मांडली. या पाचही राजवटीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरचे भौगोलिक स्थान होते. त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले.
उंची : ० फूट ⛰️
इतिहास 🚩
● सोलापूरचा भुईकोट किल्ला (Solapur fort) कोणी बांधला या बाबत तज्ञांमंध्ये मतभेद आहेत.
● काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला बाराव्या शतकात बांधला गेला होता.
● तर काही इतिहासकाराच्या मते सोलापूरचा भुईकोट किल्ला (Solapur fort) बहामनी राज्याचा प्रधान महमूद गवान याने साम्राज्य विस्तारासाठी १४६३ च्या सुमारास बांधून घेतला.
● काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेल्या या (Solapur fort) किल्ल्याभोवती महमूद गवान याने दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला.
● ‘सोलापूरचा किल्ल्ला’ (Solapur fort) हा लग्नामध्ये दोन वेळा हुंडा म्हणून दिल्याची नोंद आहे. असे म्हटले जाते परंतु याबद्दल काही पुरावा उपलब्ध नाही.
● बहामनी सत्तेनंतर हा किल्ला आदिलशाहीत होता.
● आदिलशाही नंतर हा किल्ला काही काळ निजामशाहीत होता.
● यानंतर हा भुईकोट किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.
● पुढे काही काळ हा किल्ला हैद्राबादच्या निजामशाहीतही होता.
● पुढे पेशवाई काळात मराठ्यांनी या किल्ल्यावर राज्य केले होते.
● पुढे हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यातही होता.
स्थळदर्शन 😍
◆ सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या (Solapur fort) भुईकोट किल्ल्यात पश्चिमाभिमुख प्रवेशद्वाराने प्रवेश करता येतो, ही किल्ल्याची तटबंदी तोडून केलेली व्यवस्था आहे.
◆ मुख्य प्रवेशद्वार हे सध्याच्या सावरकर मैदानाच्या बाजूने आहे.
◆ किल्ल्यात मुख्य दरवाजाने प्रवेश करताना जुनी मोठी जाड साखळी आणि वीरगळ आपल्याला दिसते.
◆ किल्ल्याला तीन बाजूनी खंदकाने वेढलेले आहे.
◆ किल्ल्याला दुहेरी तटबंदी केलेली आहे.
◆ खंदकाच्या आत असलेल्या या दुहेरी तटबंदीमुळे सोलापूरचा किल्ला (Solapur fort) अभेद्य आणि बलदंड झालेला आहे.
◆ याच्या बाहेरील तटबंदीमध्ये चार कोपऱ्यांवर चार बलदंड बुरूज आहेत.
◆ या बुरुजांना एकमेकांना जोडणाऱ्या तटबंदीमध्ये आणखी २२ बुरूज बांधून बुरुजांची एकभक्कम साखळीच निर्माण करण्यात आली.
◆ साधारण तीस फूट उंचीची तटबंदी असून त्यावर जागोजाग माऱ्यासाठी छिद्रे केलेली दिसतात.
◆ बुरुजांवर तोफा ठेवण्याची सोय करण्यात आली आहे.
◆ बाहेरील भक्कम तटबंदीच्या आत असलेली दुसरी तटबंदी उंच आहे.
◆ याच्याही चार कोपऱ्यांवर चार बुरूज असून ते अधिकच उंच बांधण्यात आलेले आहेत. या बुरुजांवरून दूरवर टेहळणी करता येत असे.
◆ किल्ल्याच्या चौथ्या बाजूला सिध्देश्वर मंदिर आणि तलाव आहे.
◆ खंदकावर बांधलेल्या आधुनिक पुलावरून आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो.
◆ किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी पूल पार केल्यावर डाव्या बाजूला झाडाझुडपांत लपलेली नागबावडी आहे.
◆ किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार म्हणजे हत्ती दरवाजा किंवा बाबा कादर दरवाजा हा गोमुखी बांधणीचा दरवाजा आजही सुस्थितीत आहे.
◆ लाकडी दरवाजावरील लोखंडी अणुकुचीदार खिळे, लोखंडी जाड पट्ट्या अजूनही शाबूत आहेत.
◆ दरवाजाच्या वर नगारखाना बांधलेला आहे.
◆ नगारखान्याच्या खालून किल्ल्यात प्रवेश केल्यावर पहारेकऱ्यांच्या खोल्या नजरेस पडतात. त्याच्या समोर घोड्याच्या पागा दिसतात.
◆ पहिल्या दरवाजाच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. दोन्ही दरवाज्यांमध्ये युध्द मैदानासारखी मोठी जागा आहे.
◆ दुसरा दरवाजा हा शहर दरवाजा या नावाने ओळखला जातो.
◆ दरवाज्याच्या वरील दोन्ही खिडक्यांमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
◆ दरवाज्याच्या मधोमध कमानीच्या वर एक पर्शियन शिलालेख व त्याच्या बाजूला दोन शरभ शिल्प कोरलेली आहेत. या शिलालेखात विजापूरचा आदिलशाह, राजा सुलतान मोहम्मद, त्यांचे अधिकारी यांचा उल्लेख आढळतो.
◆ दुसऱ्या दरवाज्याच्या डाव्या बाजूच्या बुरुजावर अस्पष्ट असा देवनागरी लिपिमधील शिलालेख नजरेस पडतो.
◆ किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराशी लागूनच महाकाळ नावाने ओळखला जाणारा बुरुज आहे.
◆ बुरुजाच्या बांधकामाच्या वेळी हा बुरुज सतत ढासळत असल्याने बुरुज बांधताना मुंजा मुलाचा बळी देण्यात आला असे सांगतात. तसेच त्या मुंजा मुलाच्या घराण्याला (जोशी घराणे) तत्कालीन शासनाने १५ रु. वर्षासन चालू केले. बुरुजामध्येच मुंजोबाचे (महाकालेश्वर) आणि शनीश्वर मंदिर आहे. येथे महाकालेश्वराचा उत्सव जोशी कुटुंबीय चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि नृसिंह जयंतीला साजरा करतात.
◆ मंदिराच्या शेजारी एक गजशिल्प आणि व्दारपालाचे शिल्प ठेवलेले आहे.
◆ याच प्रवेशद्वाराच्या वर फारसी लिपीतील शिलालेख आहे. या लेखात राजा अली आदिलशाह पहिला व त्याचा अधिकारी जाबीद खान याने मशीद, बाजारपेठ, बाग, हौद निर्माण केल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात सोलापूरचा उल्लेख संदलपूर असा आलेला आहे.
◆ तिसऱ्या दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांच्या खोलीमध्ये एक वीरगळ आहे. वीरगळीच्या बाजूस शिलालेख आहे. त्यात किल्ल्यातील विहिरीचा निर्मितीचा उल्लेख केलेला आहे.
◆ या दरवाजाच्या वरच्या बाजूस वीटांनी बांधलेली वास्तू आहे.
◆ या प्रवेशद्वाराच्या बाजूला उत्खननात सापडलेले श्री. कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर पाहावयास मिळते. १४ कोरीव खांब, बाह्य भिंतीवर व्यालशिल्पे, नागशिल्पे, विविध फुलांची शिल्पे तसेच कामशिल्पे असलेले हे मल्लिकार्जुन मंदिर आहे.
◆ मंदिराच्या डावीकडे काही अंतरावर एक वास्तू आहे. तिला ३२ खांब असल्याने ३२ खांबी मस्जिद म्हणले जाते.
◆ वास्तूच्या आणि मंदिराच्या तिरक्या दिशेला किल्ल्यातील चौकोनी आकाराचा उंच बुरुज उठून दिसतो.
◆ बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या असून तोफ ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते. शेजारीच चौकोनी दोनही बाजूस पायऱ्या असलेली गोड्या पाण्याची विहीर आहे.
◆ चौकोनी बुरुजाच्या दिशेने उजवीकडे बुरुजावरून चालत गेल्यास बुरुजावरच एक मोडी लिपीतील शिलालेख दिसतो. इ. स. १६८० चा काळ दर्शविणारा हा शिलालेख इकडील तटबंदी कच्ची होती, ती पक्की बांधून काढल्याचे सांगतो.
◆ इथूनच पुढे दर्गोपाटील बुरुज आहे. महाकालेश्वर बुरुजाप्रमाणे इथे दर्गोपाटील घराण्यातील बाळंतीणीला आत्मसमर्पण करावे लागले, तेव्हा हा बुरुज बांधून पूर्ण झाला. इथेही गुढी पाडव्याला उत्सव साजरा होतो.
◆ बुरुजावारच पद्मावती देवीचे मंदिर आहे.
◆ दर्गोपाटील बुरुजाच्या (पद्मावती) पुढेच बाळंतीण विहीर दिसते. ही विहीर लांबट आयाताकर असून त्याच्या कडेला एक हवेशीर सज्जा आहे.
◆ बाळंतीण विहिरीकडे जाताना बुरुजाच्या वरील बाजूस एक फारसी लिपीतील शिलालेख दिसतो. यामध्ये सुलातानासाठी सुखकारक, नयनरम्य महाल बांधल्याचा उल्लेख आहे.
◆ बुरुजावरून सरळ चालत गेल्यावर एक हवेशीर बाल्कनी असलेला चौक लागतो. याच बाल्कनीच्या एका स्तंभावर देवनागरी लिपीतील शके १४६६ च्या काळातील शिलालेख आहे. हा बुरुज बांधण्यासाठी दोन महिने लागले असा स्पष्ट उल्लेख यात आढळतो.
◆ इथूनच पुढे निशाण बुरुज (हनुमान बुरुज) हा टेहेळणीच्या दृष्टीने महत्वाचा किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज आहे.
◆ बुरुजावरून खाली उतरल्यावर ब्रिटीशकालीन वास्तू आहेत.
◆ तसेच शिखराचे भग्न अवशेष, स्तंभ मांडून ठेवलेले आहेत.
◆ आता जिथे उद्यान आहे त्याच्या मधोमध दोन ब्रिटिशांच्या मोहोर असलेल्या तोफा ठेवलेल्या आहेत.
◆ सध्याच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून डावीकडे आखाड्याच्या दिशेने आत गेल्यावर तटबंदीवर विविध प्रकारची शिल्पे पहावयास मिळतात.
◆ त्यात वीरगळ, विद्याधर पट, शिल्पपट आहेत असेच सरळ तटबंदीच्या कडेने चालत गेल्यास किल्ल्यातील एकमेव अशा अष्टकोनी बुरुजापाशी आपण येतो.
विशेष 🤩
भारत सरकारने या (Solapur fort) किल्ल्याला दिनांक ४ डिसेंबर, इ.स. १९३० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
कसे जाल? 🚶♂️
सोलापूर शहर रस्ता आणि रेल्वे मार्गाने इतर भागाशी जोडलेले आहे. सोलापूर रेल्वे आणि बस स्थानकातून रिक्षाने (Solapur fort) किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.
- राहाण्याची सोय : सोलापूर शहरात राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.
- पाण्याची सोय : (Solapur fort) किल्ल्यात सध्या पाणी नसल्याने पाणी सोबत ठेवावे.
- जेवणाची सोय : सोलापूर शहरात जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे.