पन्हाळा (Panhala)

पन्हाळा (Panhala) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात असलेला एक किल्ला आहे. वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान मिळालेला हा किल्ला आजही उत्तम स्तिथीत आहे.या किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट याच किल्लावर झाल्याची सांगितले जाते. या किल्ल्याचा विस्तार प्रचंड मोठा आहे. यामुळे किल्ला पूर्ण पाहाण्यासाठी किमान २ दिवस तरी पाहीजेत.

उंची : ४०४० फूट ⛰

इतिहास 🚩

● पन्हाळ्याला (Panhala) साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.
● हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला.
● हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव “पन्नग्नालय” होते.
● पराशर ॠषींनी इथे तपश्चर्या केली म्हणून हा किल्ला “पराशराश्रम” या नावानेही ओळखला जात असे.

● या किल्ल्यावर असलेल्या तळ्यात फुलणार्‍या कमळांमुळे याला “पद्मालय” असे ही म्हटले जाई.
● ब्रम्हदेवाने या डोंगरावर तपश्चर्या केल्यामुळे पुराणात याचा उल्लेख “ब्रम्हशैल’ या नावाने आहे.
● पुढे हा किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता.
●  यादवांनंतर १४८९ मध्ये पन्हाळा किल्ला विजापूरकरांकडे गेला.

● छत्रपती शिवाजी महाराजांनी हा (Panhala) किल्ला २६ नोव्हेंबर १६५९ ला जिंकून स्वराज्यात आणला.
● २ मार्च १६६० ला सिद्धी जौहरचा वेढा पडला महाराज तिथून निसटले पण किल्ला मात्र सोडावा लागला.
● पुढे कोंढाजी फर्जंद यांनी ६ मार्च १६७३ मध्ये किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला.
● यानंतर पुन्हा किल्ल्याचा ताबा मुघलांकडे गेला.

● इ.स. १६९२ परशुराम त्र्यंबक यांनी पन्हाळा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला.
● पुढे औरंगजेबाने इ.स. १७०१ मध्ये हा किल्ला जिंकला.
● त्याच वर्षी रामचंद्र्पंत आमात्र्‍यांनी तो परत जिंकून घेतला.
● पुढे १७०५ मध्ये ताराराणींनी “पन्हाळा” ही कोल्हापूरची राजधानी बनविली.

● १७०८ मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला ताराराणीं कडून जिंकून घेतला.
● इ.स. १७०९ मध्ये ताराराणीं हा किल्ला परत जिंकून घेतला .
● त्यानंतर १७८२ पर्यंत “पन्हाळा” ही कोल्हापूरची राजधानी होती.
● इ.स. १८२७ मध्ये पन्हाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

स्थळदर्शन 😍

◆ गडावर पाहण्यासारखी खूप ठिकाणे आहेत.

बाजीप्रभूंचा पुतळा : एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभुं देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.

राजवाडा : महाराणी ताराराणी यांनी इ.स. १७०9 मध्ये हा राजवाडा बांधून घेतला आहे.

सज्जाकोठी : राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. ही २ मजली इमारत इ.स. १००८ मध्ये बांधण्यात आली. पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी या इमारतीत शिवाजी महाराजांची गुप्त खलबते चालत .

राजदिंडी : ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिध्दी जौहरचा वेढ्यातून निसटले.

अंबरखाना : अंबारखाना हा पूर्वी बालेकिल्ला होता. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. सर्व कोठ्यांना हवा व प्रकाश खेळ्ण्यासाठी झरोके ठेवण्यात आले होते. याशिवाय येथे सरकारी कचेर्‍या, दारुकोठार आणि टाकंसाळ इत्यादी होती.
धान्यकोठारा जवळ एक महादेवाचे मंदिर आहे.यात पिंडीसाठी वापरण्यात आलेला शाळीग्राम तापमाना प्रमाणे रंग बदलतो,म्हणून यास रंग बदलणारी पिंड म्हणतात.

शिवमंदिर : शिवाजी महाराजांचे हे मंदिर ताराराणी राजवाड्याच्या समोर आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले. मंदिरात शिवाजी महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्ती शेजारी ताराराणींच्या पादूका आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस इ.स. पूर्व तिसर्‍या शतकातील गुहा आहेत.

चार दरवाजा : हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा दरवाजा इंग्रजांनी पाडून टाकला. त्याचे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच ‘शिवा काशीद’ यांचा पुतळा आहे.

सोमाळे तलाव : गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे.

रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी : सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे.

रेडे महाल : पन्हाळ गडावर एक भव्य आणि आडवी इमारत दिसते, त्यास रेडे महाल म्हणतात.

संभाजी मंदिर : रेडे महालाच्या पुढे एक छोटे गढी वजा मंदिर आहे, हे छ. राजारामांचा पूत्र संभाजी(१७१४-१७६०) याचे आहे. मंदिरात शिलालेख आहे.

धर्मकोठी : संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते, ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म केला जात असे.

अंधारबाव : तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची ,काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. मधल्या मजल्यावर तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा आहे. वरच्या मजल्यावर राहाण्याची सोय आहे. या इमारतीत एक शिलालेख आहे.

महालक्ष्मी मंदिर : राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे.

तीन दरवाजा : हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा. याला कोकण दरवाजा असेही म्हणतात. या दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे.दरवाजावर एक शिलालेख शरभ कोरलेले आहेत. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.

पुसाटी बुरुज : पन्हाळ्याच्या पश्चिम टोकावर हा पुसाटी किंवा पिछाडी बुरुज आहे.येथे २ बुरुज असून त्यामध्ये खंदक आहे. बुरुज काळ्य़ा घडीव दगडात बांधलेला असून त्याची उंची २० फूट आहे.

नागझरी : गडावर बारमाही पाण्याचे दगडात बांधलेले एक कुंड आहे. याला नागझरी असे म्हणतात. यातील पाणी लोहयुक्त आहे.

पराशर गुहा : पन्हाळगडावरील लता मंगेशकर यांच्या बंगल्याजवळ एकामागोमाग खोदलेल्या ५ गुहा आहेत. आतमध्ये दगडात खोदलेल्या बैठकी आहेत. याच गुहेत पराशर ॠषींनी तपश्चर्या केली होती.

दुतोंडी बुरुज : पन्हाळगडावरील न्यायालयाजवळ दोनही बाजूंनी पायर्‍या असलेला बुरुज आहे, त्याला दुतोंडी बुरुज म्हणतात.

विशेष 🤩

★ हा किल्ला (Panhala) दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
★पन्हाळा (Panhala) किल्ल्याच्या इतिहासात तीन व्यक्तींनी आपली नावे सुवर्णाक्षरांनी कोरली आहेत. आणि ती म्हणजे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद आणि कोंढाजी फर्जंद.

जवळचे किल्ले 🤩

  1. मुडागड किल्ला
  2. बहादूरवाडी किल्ला
  3. पावनगड
  4. विशाळगड

कसे जाल ?🕺🏼

चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून “एस टी’ बसने किंवा खाजगी वाहनाने किल्ल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजामार्गे गडात प्रवेश करते.
तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो.

  • राहाण्याची सोय : (Panhala) किल्ल्यावर राहण्यासाठी निवासस्थाने ,हॉटेल्स आहेत.
  • जेवणाची सोय : (Panhala) किल्ल्यावर जेवणाची सोय निवासस्थानांमध्ये होते.
  • पाण्याची सोय : (Panhala) किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
Google Map 🌎 👇🏻

पन्हाळा किल्ला

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search