राजगड (Rajgad)
राजगड (Rajgad) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड (Rajgad) किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. शिवतीर्थ रायगड (Rajgad) श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांचे सुपुत्र स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मही इथेच झाला.
उंची : ४५७३ फूट ⛰️
इतिहास 🚩
● राजगड (Rajgad) किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले.
● स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले.
● शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड (Rajgad), तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो.
● २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला.
● छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर किशोरसिंह हाडा या मोगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला.परंतु तोपर्यंत संभाजी महाराजांना पकडल्याची बातमी मराठ्यांना समजली न्हवती त्यामुळे त्यांनी स्वबळावर लगेच राजगड काबीज केला.
● ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘नाबिशहागड’असे ठेवले.
● २९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवासह राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला.
स्थळदर्शन 😍
◆ सुवेळा माची : मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव “सुवेळा” असे ठेवले. सुवेळा माचीच्या तटबंदीला एकुण १७ बुरुज आहेत. त्यापैकी ७ बुरुजांना चिलखती बुरुजांची सोय आहे.
◆ पद्मावती तलाव : गुप्त दरवाजाकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे.
◆ राजवाडा : रामेश्वर मंदिरापासून पायर्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. याशिवाय राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारुकोठार आहे.
◆ गुंजवणे दरवाजा : गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरुज आहेत. गुंजवणे दरवाजाच्या दुसर्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे. या दरवाजाच्या शेवटी व गणेश पट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिके समोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरुन श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते.
◆ पद्मावती मंदिर : सध्या २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. शिवरायांनी किल्ले मुरुंबदेवाचे राजगड (Rajgad) म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो.
◆ पद्मावती माची : राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी ,हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.
◆ संजीवनी माची : सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच किमी आहे. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे या भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दिंड्यांची व्यवस्था केलेली आहे.
◆ आळु दरवाजा : संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे. आळु दरवाजा सद्यस्थितीला ढासाळलेल्या अवस्थतेत आहे.
◆ काळेश्र्वरी बुरूज आणि परिसर : सुवेळा माचीच्या दुसर्या टप्प्याकडे जाणार्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष आहेत. या रामेश्वर मंदिरात शिवलिंग, भग्न नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात.या रामेश्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.
◆ बालेकिल्ला : राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत.
विशेष 🤩
★ राजगड (Rajgad) ही स्वराज्याची पहिली राजधानी होती.
★ राजगड (Rajgad) या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे २५ वर्षे वास्तव्य होते.
★ जगातील काही निवडक किल्ल्यांची नावे काढली तर राजगडचा त्यात समावेश नक्की होतो.
राजगडा संबधीचे उल्लेख
१)‘राजगड (Rajgad) आणि तोरणा हे दोन्ही किल्ले अभेद्य स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचा नेता शिवाजी याला राज्यविस्तारासाठी किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला‘. – जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)
२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो ‘राजगड हा अतिशय उंच त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दर्याखोर्यातून आणि घनघोर अरण्यातून वार्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.‘
३) महेमद हाशिम खालीखान याने ‘मुन्तखबुललुबाबएमहेमदॉशाही ‘ नामक ग्रंथामध्ये म्हणतो,‘राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु ? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्यांचा विस्तार ! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशु दिसत, त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग, त्याचा घेर बारा कोसांचा, त्याला सगळीकडून वेढा घालणे कठिण होते.
जवळचे किल्ले 😍
- तोरणा
- सिंहगड
कसे जाल ? 🕺🏼
कर्जत, पाली, पुणे, गुंजवणे या बसस्थानकांवरून जाणाऱ्या महाराष्ट राज्य परिवहन मंडळाच्या एस्टी गाड्या किंवा खाजगी वाहने.
- राहाण्याची सोय : १) गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.
२) पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत. - जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
- पाण्याची सोय : पद्मावती मंदिराच्या समोरच बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.