विजयदुर्ग (Vijaydurg)
भारताच्या महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक मिश्रदुर्ग म्हणजेच “विजयदुर्ग” (Vijaydurg) किल्ला. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. वाघोटन नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तिथे तीन बाजूंनी समुद्राच पाणी आणि एका बाजूने जमीन यांच्यामध्ये असलेल्या या किल्ल्याला “घेरिया” या नावाने देखील ओळखले जाते. १२ व्या शतकापासून अनेक राजवटी पाहिलेला हा किल्ला १७ व्या शतकात मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र देखील होता. सुंदर भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला आणि विविध घटनांचा साक्षिदार असलेला हा विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या गतवैभवाचे अवशेष अंगा खांद्यावर बाळगत उभा आहे.
उंची : १०० फूट ⛰️
इतिहास 🚩
● कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज याने इ.स. ११९३ ते इ.स.१२०६ हा (Vijaydurg) किल्ला बांधला.
● पुढे हा किल्ला यादवांच्या राज्यात होता.
● यानंतर हा किल्ला विजयनगर साम्राज्यातही होता.
● पुढच्या काळात हा किल्ला बहामनी सत्तेतही होता.
● बहामनी सत्तेनंतर हा किल्ला आदिलशाहीत आला.
● टॅव्हेरनिअर याने इ.स. १६५० मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याने या किल्ल्याचे वर्णन ‘विजापूरकरांचा अभेद्य किल्ला’ असे करून ठेवले आहे.
● छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग (Vijaydurg) किल्ला जिंकला.
● हा किल्ला जिंकून महाराजांनी त्याचे नाव विजयदुर्ग (Vijaydurg) ठेवले.
● महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून घेतली.
● पुढे कान्होजी आंग्रेच्या काळात या किल्ल्याला अजून महत्व प्राप्त झाले.
● इ.स. १७१७ मध्ये मराठ्यांनी इंग्रजांचे “ससेक्स” जहाज पकडून विजयदुर्ग (Vijaydurg) बंदरात ठेवले होते.
● इंग्रजांनी इ.स. १७१८ मध्ये प्रचंड आरमारानीशी विजयदुर्गावर हल्ला चढवला, पण किल्ल्यावरून रुद्राजी धुळपने तो हल्ला परतवून लावला. प्रचंड दारूगोळा आणि २०० सैनिकांचे प्राण गमवून इंग्रजांचे आरमार मुंबईला परत गेले.
● इ.स.१७२० मधे इंग्रज कॅप्टन ब्राऊनने अनेक लढाऊ जहाज घेऊन विजयदुर्गावर हल्ला केला.
● त्यांच्या ताफ़्यात “फ़्राम” नावाची प्रचंड युध्दनौका होती. तरीही इंग्रजांना हार पत्करावी लागली.
● मराठ्यांनी इंग्रजांचा पाठलाग चालू केल्यावर त्यांच्या हाती “फ़्राम” लागू नये म्हणून इंग्रजांनी ती युध्दनौका जाळुन बुडवली.
● संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इ.स. १७५६पर्यंत होता.
● इ.स.१७५६ मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला.
● या युध्दात मराठ्यांचे संपूर्ण आरमार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल आणि नष्ट झाल. विजयदुर्ग (Vijaydurg) किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
● पेशव्यांशी झालेल्या तहात इंग्रजांनी बाणकोट किल्ल्याच्या बदल्यात विजयदुर्ग (Vijaydurg) किल्ला पेशव्यांना दिला.
● पेशव्यांनी आनंदराव धुळपांची विजयदुर्गावर नेमणुक केली.
● पुढे १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला.
स्थळदर्शन 😍
◆ विजयदुर्ग (Vijaydurg) गावातून आपल्याला सरळ किल्ल्यावर जाता येते.
◆ किल्ल्याच्या एका बाजूला जी जमीन आहे तिकडे पूर्वी खंदक होते.
◆ किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी या खंदकावर उचलता येणारा लाकडी पूल होता.
◆ गडात प्रवेश केल्यावर गडाचा पहिला दरवाजा “हनुमंत दरवाजा” आणि त्याच्या समोर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हनुमंताचे देउळ आपल्याला दिसते.
◆ समोरच एक तोफही ठेवलेली आहे.
◆ पुढे गेल्यावर भक्कम जिबीचा दरवाजाला पाहायला मिळतो.
◆ दरवाजातून आत शिरल्यावर किल्ल्याच्या पडकोटाला असलेल्या तीन तटबंद्या पाहायला मिळतात.
◆ समुद्रालगत असलेली पहिली तटबंदी ३० फ़ूट उंचीची आहे.
◆ त्यानंतर दुसरी तटबंदी १० फ़ूट उंचीची आणि मुख्य किल्ल्याची तिसरी तटबंदी ३० फ़ूट उंच आहे.
◆ दुसर्या आणि तिसर्या तटबंदीच्या मधे असलेल्या फ़रसबंदी मार्गाने पुढे गेल्यावर गोमुखी रचनेचे भव्य “यशवंत” महाव्दार लागते.
◆ किल्ल्यात प्रवेश केल्यावर पोलिस चौकी समोर रचुन ठेवलेले तोफगोळे पाहायला मिळतात.
◆ प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डाव्या बाजुला आपल्याला खलबतखान्याची इमारत दिसते.
◆ तेथुन पुढे सदरेची भव्य इमारत दिसते.
◆ सदरेच्या पुढे एक चुन्याचा घाणा आपल्याला दिसतो.
◆ पुढे बुरुजावरच बांधलेल्या दोन मजली इमारती दिसतात. त्यांना माडी म्हणतात.
◆ पुढे राणीवसाची इमारत एका भव्य बुरुजावर बांधलेली आपल्याला दिसते.
◆ तटबंदीच्या आतल्या बाजूस खाली अनेक उध्वस्त चौथरे दिसतात.
◆ पुढे तटबंदीवर चढुन चालायला सुरुवात केल्यावर अनुक्रमे गणेश, राम, हणमंत आणि दर्या बुरुज पाहायला मिळतात.
◆ दर्या बुरुजाला असलेल्या पायर्यांवरुन खाली उतरल्यावर एक चौकोनी विहिर पाहायला मिळते.
◆ त्याच्या पुढे एक चुन्याचा घाणा आहे.
◆ चुन्याचा घाणा पाहून परत तटबंदीवर चढल्यावर अनुक्रमे तुटका, शिकरा, सिंदे, शहा, व्यंकट, सर्जा, शिवाजी, गगन, मनरंजन बुरुज पाहायला मिळतात.
◆ मनरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जातांना उजव्या बाजुला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो.
◆ गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो.
◆ समुद्रापासून ३२ मीटर उंच असलेल्या या बुरुजाला “खुबलढा किंवा बारातोपा बुरुज” या नावाने ओळखतात.
◆ या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला बोगदा बनवलेला आहे. त्यात काही तोफ़गोळे ठेवलेले आहेत.
◆ खुबलढा बुरुज पाहुन पुन्हा तटबंदीवर येउन पुढे गेल्यावर घनची, पान बुरुज पाहायला मिळतात.
◆ पुढे एक वास्तू पाहायला मिळते. त्यावर दारुकोठार अस नाव लिहिलेल आहे.
◆ दारूकोठार पाहून झाल्यावर तटबंदीवरुन उतरून किल्ल्याच्या आत असलेल्या टेकडी भोवती बांधलेल्या तटबंदीच्या आत प्रवेश करुन चोर दरवाजाच्या दिशेने चालत गेल्यावर एक विहिर पाहायला मिळते.
◆ ती पाहून आखलेल्या मार्गावरून चालायला सुरुवात केल्यावर भग्न भवानी मंदिर पाहायला मिळते.
◆ पुढे उजव्या बाजूस काही सिमेंटचे ओटे पाहायला मिळतात. त्याला “साहेबांचे ओटे” म्हणतात.
◆ पुढे पायवाटेच्या डाव्या बाजूस एक लहान व एक प्रचंड मोठा हौद पाहायला मिळतो.
◆ मोठ्या हौदात उतरण्यासाठी पायर्या आहेत. दोनही हौद कोरडे आहेत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी हे हौद बांधण्यात आले होते.
◆ साठलेले पाणी जमिनीत मुरु नये म्हणुन हौद बांधताना शिश्याचा वापर केला होता.
◆ हौदाच्या पुढे असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावर धान्य कोठार होते.
◆ इमारत पाहुन पुढे गेल्यावर जखिणीचे मंदिर व त्यासमोर ठेवलेली जखिणीची तोफ़ पाहायला मिळते.
◆ ती पाहुन पायवाटेने तोफ़गोळे ठेवलेल्या पोलिस चौकीकडे येताना वाटेत घोड्याच्या पागा, हौद, एक विहिर आणि तुळशी वृंदावन पाहायला मिळते.
◆ इथेच तटबंदी जवळ खाली उतरणार्या पायर्या दिसतात. इथे एक भूयार असून ते गिर्ये गावातील आनंदराव धुळपांच्या वाड्यात उघडते अशी वदंता आहे.
◆ पण विजयदुर्ग ते गिर्ये (७ किमी) अंतर पाहात असे बुयार असण्याची शक्यता कमी आहे. (हे दारू कोठार असण्याची शक्यता आहे)
◆ विजयदुर्ग पासून ७ किमी अंतरावर गिर्ये गाव आहे.
◆ या गावात बस स्थानका मागे आनंदराव धुळपांचा वाडा आहे.
◆ कान्होजी आंग्रेंच्या काळात वाघोटन खाडीत दगड फ़ोडून आरमारी गोदी (Dry Dock) बांधण्यात आली होती. या ठिकाणी जहाज बांधणी आणि दुरुस्तीची कामे केली जात.
◆ विजयदुर्ग (Vijaydurg) पासून ३ किमीवर रामेश्वर मंदिर आहे. त्याच्या जवळ संभाजी आंग्रे यांची समाधी आहे.
विशेष 🤩
★ इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावरुन केलेल्या निरिक्षणात “हेलियम वायूचा” शोध लागला.
★ विजयदुर्ग (Vijaydurg) हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वोत्कृष्ट विजय मानला जातो.
★ किल्ल्याच्या भोवती समुद्रात एक भिंत आहे. या भिंतीचा किल्ल्याच्या संरक्षणाच्या हेतूने खूप फायदा होतो. शत्रू पाण्यातून आक्रमण करून आला की त्याची जहाजे या भिंतीवर आपटून फुटून जात असत.
जवळचे किल्ले 😍
- देवगड
- पूर्णगड
कसे जाल ? 🚶
रस्त्याने :- मुंबई – गोवा महामार्गावर मुंबई पासून ४७१ किमीवर तळेरे फ़ाटा आहे. येथून ५५ किमीवर विजयदुर्ग आहे.
रेल्वेने :- कोकण रेल्वेवरील वैभववाडी हे जवळच स्थानक विजयदुर्ग पासून ६७ किमी अंतरावर आहे.
- राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
- जेवणाची सोय : किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
- पाण्याची सोय : किल्ल्यावर पाण्याची सोय नाही. किल्ल्यावर जाताना पाणी सोबत घेऊन जावे.