राजमाची (Rajmachi)

राजमाची (Rajmachi) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. कल्याण – नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती. या बंदरापासून बोरघाट हा पुण्याकडे जाणारा हा पुरातन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणार्‍या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख किल्ला म्हणजे राजमाची. किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर किल्ले, तर दुसर्‍या बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे.

उंची : ३६०० फूट ⛰️

इतिहास 🚩

● राजमाची (Rajmachi) किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौध्द लेणं आहे. यालाच ‘कोंढाणे लेणी’ असे म्हणतात.
● ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत.
● या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा.
● राजमाची (Rajmachi) किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणचा दरवाजा’संबोधण्यात येत असे.
● कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची (Rajmachi) ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले.

● यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला.
● सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला.
● १७७६ मध्ये सदाशिवररावांच्या तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला. त्याने राजमाची (Rajmachi) किल्ला घेतला.
● यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.

● पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला.

स्थळदर्शन 😍

◆ किल्ल्याजवळ असलेल्या उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळ एका मोठ्या दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थनिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे. या परिसरात याला ‘जिजाऊ कुंड ’म्हणतात या कुंडात लोक मोठ्या श्रध्देने स्नान करतात.
◆ लोणवळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला (Rajmachi) येतांना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योध्द्याचे स्मारक ,अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष,गणपती आणि मारुतीरायाची मूर्ती आहे.
◆ किल्ल्यावरून आजुबाजूचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे तिला ‘उधेवाडी’ असे म्हणतात.
◆ राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती ‘कातळदरा’ या नावाने ओळखली जाते.

Rajmachi
कोंढाणे लेणी

◆ या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला ‘भैरव डोंगर’ म्हणतात.
◆ अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची (Rajmachi) किल्ल्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन, बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात.
◆ श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखलपट्टी आहे, यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे.
◆ येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन या बालेकिल्ल्यांवर जाणारी आहे.
◆ राजमाची वर ‘उधेवाडी’ गावातून थोडं खाली उतरून गेलं की एक पायऱ्यांची वाट आपल्याला उदयसागर तलावाकडे घेऊन जाते.

Rajmachi

◆ हा तलाव दगडी बांधकाम करून बांधलेला आहे. तत्कालीन मामले दंडाराजपुरी यांनी हा तलाव इ. स. १७१२ साली बांधला असून त्यांच्या नावाचा शिलालेख तलावाच्या भिंतीवर आहे
◆ या तलावाच्या बाजूलाच एक शिवमंदिर आहे. हेमाडपंथी असणारे हे मंदिर सुमारे ८व्या शतकात बांधण्यात आलेले आहे.
◆ या मंदिरासमोरच गोमुख असून त्यातले पाणी समोरच्या टाक्यामध्ये पडते. टाक्यासमोर एक सभामंडप आहे ज्यात एक स्तंभ आहे.
◆मंदिराच्या उजव्या बाजूला मंदिराचा गाढला गेलेला कळस आहे.

Rajmachi

◆ मनरंजन :- उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणार्‍या या बालेकिल्ल्यावर जाणरी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहोचतो. या बालेकिल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे. बालेकिल्ल्यावर गेल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडालेले उत्तम दगडीबांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन – चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईशाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो.

Rajmachi

◆ श्रीवर्धन :- राजमाचीच्या असणार्‍या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला आहे. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बर्‍यापैकी सुस्थितीत आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते. दरवाजाची कमान बर्‍यापैकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे. समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोट्याचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो.

विशेष 🤩

भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ एप्रिल, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
राजमाची किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत जे स्वतंत्र किल्ले आहेत. एक म्हणजे श्रीवर्धन आणि दुसरा म्हणजे मनरंजन.

जवळचे किल्ले 🤩

  1. कोथळीगड
  2. सोंडाई
  3. माणिकगड
  4. मृगगड
  5. विसापूर
  6. लोहगड


कसे जाल ? 🚶🏻

लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे:- लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची (Rajmachi) गावात यावे. ही वाट एकदंर १९ किमी ची आहे. वाटेने किल्ल्यावर जाण्यास ५ तास लागतात.
कर्जतहून कोंदीवडे मार्गे:- कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने यावे. इथून गडावर जाण्यास सुमारे ३ ते ४ तास लागतात.

  • राहाण्याची सोय : उधेवाडी गावात राहण्याची उत्तम सोय होते. भैरवनाथाच्या मंदिरातही आणि बालेकिल्ल्यावर जातांना लागणार्‍या गुहेतही रहाता येते.राजमाची रुलर एड एन्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेने बांधलेल्या खोल्यांमध्येही रहाण्याची व्यवस्था होते.
  • जेवणाची सोय : राजमाची (Rajmachi) गावात जेवणाची उत्तम सोय होते.
  • पाण्याची सोय : राजमाची (Rajmachi) गावात पाण्याची सोय होते.

Google Map 🌎

राजमाची किल्ला

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search