कोलाबा ( kolaba )
अलिबागच्या समुद्रात किनारपट्टीपासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर असणारा कोलाबा (kolaba) किल्ला हा एक मिश्रदुर्ग आहे.
कोलाबा आणि सर्जेकोट ही किल्ल्यांची जोडगोळी किनारपट्टीपासून जवळ असल्या कारणाने आहोटीच्या वेळी किल्ल्यावर चालत जाणे शक्य असते किंवा घोडागाडीने जाता येते.
उंची : 0 फूट ⛰️
इतिहास 🚩
● १९ मार्च १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या (kolaba) किल्ल्याच्या बांधकामाला सुरवात करून घेतली.
● महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून घेतले.
● १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली.
● १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला.
● काही काळ हा किल्ला पेशवाईत होता.
● तर काही काळ हा किल्ला इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता.
● आज कोलाबा (kolaba) किल्ला पुरातत्व खात्याकडे देखरेखीस आहे.
स्थळदर्शन 😍
◆ अलिबाग वरून किल्ल्याकडे जाताना उजव्या हाताला दिसतो तो सर्जेकोट.
◆ सर्जेकोट एक मोठा बुरुज आहे, ज्याला एक स्वतंत्र दरवाजा आहे. दरवाजा हा समुद्राच्या दिशेला आहे.
◆ सर्जेकोटावर एक पाण्याचे टाके आणि मंदिर आहे, येथील झाडे वाढल्यामुळे ते पहावयास मिळत नाहीत.
◆ दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूला पायऱ्या आहेत ज्या आपल्याला अलंग्यावर घेऊन जातात.
◆ सर्जेकोट अजूनही सुस्थितीत आहे.
◆ सर्जेकोट मधून बाहेर आल्यावर सर्जेकोट आणि कोलाबा या किल्ल्यानां जोडणारा दगडी पूल आपल्याला दिसतो.
◆ किल्ल्याचे प्रवेशद्वार किनार्याच्या बाजूस पण, इशान्येकडे वळवलेले आहे.
◆ किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत.
◆ दुर्गाचा दुसरा दरवाजा अवशेष रुपात शिल्लक आहे.
◆ किल्ल्याला १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत.
◆ प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे.
◆ बाजूलाच एक छोटी विहीर आहे तिला अंधारबाव अस नाव आहे. ह्या मंदिराजवळच तिथे राहणारे पुजारी व त्यांच्या कुटुंबाची ४-५ घरे आहेत.
◆ पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात.
◆ इथेच नानी साहेबांचा वाडा आहे. नानी साहेब म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई. हा वाडा आता संपूर्ण भग्नावस्थेत आहे. डाव्या बाजूला रघुजी आंग्रे यांचा वाडा आहे.
◆ डावीकडची वाट हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार ह्यांच्या दर्ग्याकडे जाते.
◆ परतीच्या वाटेवर डावीकडे आंग्य्रांच्या वाड्याचे अवशेष दिसतात.
◆ किल्ल्यावर अजुनही लोकांचा राबता असलेले सिध्दीविनायकाचे मंदीर आहे. गणेशमूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफूट आहे.१७५९ साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो.
◆ मंदिराच्या प्राकारातच उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे.
◆ मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे.
◆ जी ३५ मिटर लांब आणि ३८ मिटर रुंद आहे. या पुष्करणीच्या एका भिंतीतील देवळीत साती आसरा ( अप्सरा ) यांच्या प्रतिमा आहेत.
◆ पुष्कर्णीच्या पुढे तटा पलिकडच्या दरवाजातून बाहेर गेल्यावर स्वच्छ पाण्याची विहीर आहे. या विहिरीला आत उतरायला पायर्या आहेत. अश्या दोन विहिरी किल्ल्यावर आहेत.
◆ दुर्गाच्या दक्षिण टोकाला असणार्या दरवाजाला धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा / दर्या दरवाजा म्हणतात. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली आहे.
◆ दरवाजालगत कान्होजींची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे.
◆ आपल्याला ह्या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये जागोजागी खोल्या असल्याचे आढळते, या खोल्या पहारेकऱ्यांसाठी होत्या.
◆ तटबंदीवरून चालत गेलो की आपल्या कुंपण घालून ठेवलेल्या २ तोफा दिसतात . नीट बारकाईने लक्ष दिले तर समजते की या तोफा सन १८४९ आणि १८५१ साली इंग्लंडमधील यॉर्कशायर येथे तयार करण्यात आल्या आहेत.
◆ याशिवाय अजूनही ५ – ६ छोट्या तोफा या किल्ल्यावर आहेत.
◆ तोफा बघून तटबंदीवरून खाली उतरलो की एक खोली दिसते जी मुख्य दरवाज्या पासून जवळच आहे. या खोलीबद्दल असे म्हटले जाते की ही धान्याची कोठार असावी, परंतु स्थानिकांच्या मते हा एक सुरुंग होता जो हिराकोट ह्या किल्ल्यात निघतो, परंतु आता तो बंद करण्यात आला आहे.
विशेष 😍
🔸इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.
🔸अलिबागच्या तीस किलोमीटरहुन अधिक किनारपट्टीला अष्टागर नावाने ओळखले जाते, आणि किल्ले कोलाबाला (kolaba) या अष्टागरचा राजा म्हटले जाते.
🔸या किल्ल्याच्या बांधकामात चुन्याचा वापर न करता दगड फक्त एकावर एक रचले आहेत. ज्यामुळे समुद्राच्या लाटांचे पाणी दगडांवर आदळते आणि चिरांमधून आत जाऊन बाहेर येते. यामुळे तटबंदीची झीज होत नाही.
कसे जाल ? 🚶
मुंबईहून – पनवेल – वडखळ मार्गे अलिबागला जावे, अलिबागच्या समुद्र किनार्यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते.
- राहाण्याची सोय :गडावर राहण्याची सोय नाही ,राहण्याची सोय अलिबाग मध्ये आहे.
- जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही ,जेवणाची सोय अलिबाग मध्ये आहे. रविवारच्या दिवशी काही गावकरी खाण्याचे पदार्थ विकायला बसलेले दिसतात.
- पाण्याची सोय :गडावर पाण्याची सोय नाही , पाण्याची सोय अलिबाग मध्ये आहे.
खांदेरी (Khanderi) - trekkers ig
3 years ago[…] कोलाबा […]